Sunday, June 1, 2025
डॉक्टर व परिचारिकेच्या हलगर्जीपणामुळे अलिबागमध्ये मातेचा मृत्यू
डॉक्टर व परिचारिकेच्या हलगर्जीपणामुळे अलिबागमध्ये मातेचा मृत्यू ...

अलिबाग : डॉक्टर व परिचारिकेच्या हलगर्जीपणामुळे अलिबाग तालुक्यात एक मातामृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अलिबाग तालुक्यातील डॉ. अनिल फुटाणे यांच्या रुग्णालयात ही घटना घडली. प्रसुतीनंतर काही तासांतच मातेचा मृत्यू झाल्यामुळे मुलगा झाल्याचा आनंद थळे कुटुंबियांच्या चेहऱ्यावर जास्त काळ टिकला नाही. याप्रकरणी डॉक्टर व परिचारिका यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी थळे कुटुंबियांनी केली आहे.

अलिबाग तालुक्यातील घोटवडे सुचिता सुशील थळे यांना प्रसूतीसाठी शहरातील फुटाणे रुग्णालयात १४ एप्रिल रोजी दुपारी दाखल करण्यात आले होते. डॉ. अनिल फुटाणे यांनी सुचिता यांना तपासल्यानंतर त्यांच्या पोटातील पाणी कमी झाले असल्याने सिझर करावे लागेल असे सांगितले. त्यानुसार सिझर केल्यानंतर सुचीताने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

मुलगा झाला म्हणून सर्व कुटुंबिय आनंदित होते. सायंकाळ पर्यंत सुचिता हीची तब्येत उत्तम होती. रात्री छातीत जळजळ होत असल्याचे तिने जाऊ आश्लेषा थळे हिला सांगितले. त्यांनतर तिने तेथील परिचारिका याना सांगून डॉक्टरांना बोलावण्याची वारंवार विनंती केली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सकाळी सुचिता हीची तब्येत जास्तच बिघडली. त्यांनतर आश्लेषा यांनी गोंगाट घातल्यानंतर डॉक्टर आले. मात्र सुचिता हिची तब्येत जास्तच बिघडली असल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात सांगितले, असल्याचा आरोप मृत सुचिता थळे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. सुचिता हिला जिल्हा रुग्णालयात पुढील उपचाराकरिता हलविण्यात आले मात्र तिचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या घटनेनंतर सुचिता हिच्या नातेवाईक संतप्त झाले होते. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती अखेर पोलिसांना बोलावण्यात आले. डॉक्टर व परीचरिकेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. याप्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलीसांनी दिल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील नातेवाईकांची गर्दी पांगली.

सुचिता हिच्या शरीरातील फुफ्फुसाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्या. यामुळे फुफ्फुसाला पुरेसा रक्त पुरवठा झाला नाही. तसेच तिची ऑक्सिजनची पातळी खालावली व त्याचा परिणाम इतर अवयवांवर झाल्याने सुचिता हिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समजू शकणार आहे.


सुचिता ही १४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल झाली. सोनोग्राफी रिपोर्टनुस्त तिच्या शरीरातील पाणी कमी झाले होते. यामुळे नातेवाईकांच्या परवानगीने सिझर करण्याचा निर्णय घेतला. सिझर केल्यानंतर बाळ व माता दोघांचीही प्रकृती ठीक होती. रात्रीच्या सुमारास सुचिता हिला थोडी थंडी जाणवू लागली. मात्र थोड्या वेळाने थंडी कमी झाली. सकाळी तिला दम लागू लागला. परिचारिकेने मला कळविल्यानंतर मी लागलीच येऊन उपचार सुरू केले. मात्र सुचिता ही उपचारांना दाद देत नसल्याने तिला जिल्हा रुग्णालयात पुढील उपचाराकरिता हलविले होते.

: डॉ. अनिल फुटाणे

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx