Sunday, June 1, 2025
दोन एसटी बसमध्ये चिरडून मोटारसायकल स्वाराचा मृत्यू
दोन एसटी बसमध्ये चिरडून मोटारसायकल स्वाराचा मृत्यू...

अलिबाग : अलिबाग बस आगारासमोर दोन एस.टी. बसमध्ये चिरडून मोटारचालक स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.२७) ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. जयदीप बना (रा. वरसोली) मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातानंतर मृत तरुणाचे नातेवाईक व ग्रामस्थांनी अलिबाग एस. टी. आगर समोर जोरदार राडा केला. अपघातग्रस्त एस. टी. बसवर जमावाने दगडफेक करीत बसच्या काचा फोडल्या. तसेच सुमारे तीन तास वाहतूक रोखून धरली. यामुळे प्रवाशांसह, विद्यार्थी, इयत्ता दहावी परिक्षार्थींचे हाल झाले. दरम्यान, पोलिसांनी जमावाची समजूत काढीत आगार समोरील रस्ता मोकळा केला. तसेच अपघातग्रस्त दोनही बस पोलीस ठाणे येथे नेण्यात आल्या.

अलिबाग एस. टी. बस आगारासमोर वर्दळीच्या वेळेत हा अपघात घडला. ११.४५ वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनचालकाने ब्रेक दाबला. यामुळे कारच्या पाठी असलेल्या एस. टी. बसचालकाने बस थांबविली. यांनतर बसच्या पाठी असलेल्या जयदीप बना या मोटारसायकल स्वाराने आपली मोटारसायकल एस. टी. बसच्या पाठी थांबविली. मात्र याचवेळी मोटारसायकल पाठून येणाऱ्या दुसऱ्या एस. टी. बसची धडक जयदीप बना याच्या मोटरसायकलला बसली. या धडकेमुळे जयदीप बना हा दोन एस. टी. बसमध्ये चिरडला गेला. हा अपघात एवढा भीषण होता की जयदीप बना याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी एस टी. बसची रस्त्यावर असलेल्या एका रिक्षालाही धडक बसल्याने रिक्षाचे नुकसान झाले आहे.

जयदीप बना याचा अपघाती मृत्यू झाल्याची खबर वरसोली गावात समजताच बना याचे नातेवाईक व ग्रामस्थांनी अलिबाग एस. टी. आगार येथे धाव घेतली. अपघाताचे चित्र पाहताच या सर्वांचा संताप अनावर झाला. त्यांनी अपघातग्रस्त एस. टी. बस व एस. टी. आगारात दगडफेक केली. आंदोलन करीत वाहतूक रोखून धरली. अलिबाग पोलिसांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते काहीही एकूण घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. यांनतर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिसांची अधिक कुमक मागविण्यात आली. शीघ्र कृती दलाच्या तुकडीला प्राचारण करण्यात आले. यांनतर पोलिसांनी जमावाची पुन्हा समजूत काढली. सुमारे तीन तासानंतर जमावाची समजूत काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच दोनही एस. टी. बस पोलीस स्थानक परिसरात नेण्यात आल्या. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यावेळी मृत बना याच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी पोलीस ठाणे येथे गर्दी केली होती.

प्रवासी विद्यार्थ्यांचे हाल

जमावाने सुमारे तीन तास वाहतूक रोखून धरल्याने प्रवासी तसेच विद्यार्थ्यांचे हाल झाले. एस. टी. बसने प्रवास करणारे प्रवासी आगारात अडकून पडले. तसेच विद्यार्थांची हाल झाले. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना ताटकळत वाहतूक सुरू होण्याची वाट पहावी लागली. सध्या दहावीची परीक्षा सुरू असून, अलिबाग शहरातील शाळांमध्ये परिक्षा केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांना वाहतूक सुरू होण्याची वाट पहावी लागली.

एस. टी. आगारातील कर्मचाऱ्यांनी काढला पळ

संतप्त जमावाने अपघातग्रस्त एस. टी. बसवर दगडफेक करीत बसच्या काचा फोडल्या. यावेळी काही जणांनी आगारात दगड फेकले. संतप्त जमाव पाहून बस आगारातील कर्मचाऱ्यांनी पळ काढला. जमाव आगार परिसरातून गेल्यानंतर कर्मचारी पुन्हा आगारात आले व त्यानंतर एस. टी. बस सेवा सुरु करण्यात आली.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx