मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या सहाय्याकांमार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे.
सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रौर्याची परिसीमा दाखवणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देवगिरी बंगल्यावर अजित पवार, देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची एक बैठक पार पडली होती. जवळपास दोन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना उद्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या, अशी सूचना केली होती. त्यानुसार धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx