अलिबाग : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे हाणामारी प्रकरणात तब्बल १३ वर्षांनी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्यासह २१ आरोपींना ७ वर्ष ३ महिने कारावास व ७ हजार ३०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात ४ जणांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली. मात्र निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या नितेश सुनील गुरव याच्यावर निकालानंतर थोड्या वेळानेच काळाने घाला घातला. यकृताच्या आजारासोबत दोन हात करीत असलेल्या नितेश गुरव याचा गुरुवारी रात्री न्यायालयातून घरी परतताना वाटेतच हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
चोंढी गावात १३ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी आपल्या साथीदारांसह पाच जणांना तलवार, लोखंडी शिगा व लाकडी दांडक्याच्या सहाय्याने मारहाण केली होती. या प्रकरणात २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने बुधवारी (दि. 30) निकाल दिला. न्यायालयाने दिलीप भोईर यांच्यासह २१ जणांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली. तर चार जणांची निर्दोष मुक्तता केली.
निर्दोष मुक्त झालेला नितेश सुनील गुरव हा या निकालानंतर न्यायालयाबाहेर आल्यानंतर काही काळ तो भावनिक अवस्थेत होता. नितेश गुरव याला यकृताचा आजार आहे. प्रकरणातील मानसिक ताण, न्यायालयीन चढ-उतार आणि निकालाचा ताण सहन न झाल्याने झिराड येथील घरी जातना अचानक छातीत दुखू लागले होते म्हणून नितेश सुनील गुरव याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, रुग्णालयात नेण्यापूर्वीयच त्याचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. नितेश सुनील गुरव याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आले आहे.
चोंढी मारहाण प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आलेल्या जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्यासह आणखी तीन जणांची प्रकृती अत्यावस्थ झाल्याने त्यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर उर्वरित १७ आरोपींची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्यात आली आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx