Sunday, June 1, 2025
पाणी पुरवठा व बाल विकास विभागात ५ कोटी ३५ लाख ५६ हजार रुपयांचा गैरव्यवहार
पाणी पुरवठा व बाल विकास विभागात ५ कोटी ३५ लाख ५६ हजार रुपयांचा गैरव्यवहार ...

अलिबाग : ग्रामीण पाणी पुरवठा अलिबाग उपविभागात कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगारव्यतिरिक्त इतर फरकाची रक्कम दाखवून १ कोटी २३ लाख २१ हजार ४९९ रुपयांचा गैरव्यवहार वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरडे याने केला असल्याचे यापूर्वी उघडकीस आले असताना, नाना कोरडे याने आणखी दोन साथीदारांच्या साहाय्याने अलिबाग बालविकास सेवा योजना प्रकल्पात ४ कोटी १२ लाख ३४ हजार ७७१ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. पाणी पुरवठा व बालविकास विभागातील गैरव्यवहार प्रकरणी वरिष्ठ सहाय्यक नाना कोरडे तसेच बालविकास विभागातील गैरव्यवहार प्रकरणी नाना कोरडे यांच्यासह कनिष्ठ सहाय्यक ज्योतीराम वरोडे, कनिष्ठ सहाय्यक महेश मांडवकर यांच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात दोन‌ वेगवेगळे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी नाना कोरडे याला अटक केली आहे.


पंचायत राज सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात येतो. पगार व पगारव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना मिळणारे इतर फरक देण्यासाठी दोन स्तर स्थापन करण्यात आले आहेत. याच बाबीचा फायदा वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरडे याने उचलला. नाना कोरडे याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत असताना कर्मचाऱ्यांना पगारव्यतिरिक्त इतर फरकाची रक्कम दाखवून १ कोटी २३ लाख २१ हजार ४९९ रुपयांचा गैरव्यवहार केला.


ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यरत होण्याआधी कोरडे हा अलिबाग बालविकास सेवा योजना प्रकल्प येथे कार्यरत होता. बालविकास सेवा योजना प्रकल्पात नाना कोरडे, कनिष्ठ सहाय्यक ज्योतीराम वरोडे, कनिष्ठ सहाय्यक महेश मांडवकर यांनी मिळून ४ कोटी १२ लाख ३४ हजार ७७१ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे.


* ग्रामीण पाणी पुरवठा अलिबाग उपविभागातील गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरडे याच्याविरुद्ध जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कार्यवाही केली आहे. तसेच अलिबाग बालविकास सेवा योजना प्रकल्प येथील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर कनिष्ठ सहाय्यक ज्योतीराम वरोडे, कनिष्ठ सहाय्यक महेश मांडवकर यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

* पाणी पुरवठा विभागात १ कोटी १९ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याची बाब उघडकीस येताच गैरव्यवहार करणाऱ्या नाना कोरडे याने गैरव्यवहार केलेल्या रकमेपैकी सुमारे ६८ लाख रुपयांची रक्कम जिल्हा परिषद प्रशासनाच्या हवाली केली होती. तसेच अलिबाग बाल विकास सेवा योजना प्रकल्प येथील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर नाना कोरडे याने २ कोटी २३ लाख ५० हजार ६०० रुपयांची रक्कम पुन्हा  बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या नावाने असलेल्या खात्यात पुन्हा जमा केली आहे.

* वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरडे याने कर्मचाऱ्यांना पगारव्यतिरिक्त इतर फरकाची रक्कम दाखवून पाणी पुरवठा अलिबाग उपविभागात गैरव्यवहार केला होता. सदर बाब इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन करताना जिल्हा परिषदेतील एका कर्मचाऱ्याच्या  लक्षात आली. यांनतर सदर बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. डॉ. भरत बास्टेवाड यांनी याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांना चौकशीचे आदेश दिले. तसेच उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महादेव टेळे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीने कसून चौकशी करीत पाणी पुरवठा विभागात १ कोटी २३ लाख २१ हजार ४९९ रुपये तर अलिबाग बाल विकास सेवा योजना प्रकल्प विभागात नाना कोरडे, कनिष्ठ सहाय्यक ज्योतीराम वरोडे, कनिष्ठ सहाय्यक महेश मांडवकर यांनी ४ कोटी १२ लाख ३४ हजार ७७१ रुपये गैरव्यवहार केला असल्याचा अहवाल सादर केला आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx