अलिबाग : प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, वेश्वी आणि राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खैरवाडी, रामराज जिल्हा परिषद मराठी शाळा येथे सात दिवसीय विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर सोमवार २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर कालावधीत यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, संस्थेचे प्रशासकीय सल्लागार गाबाजी गीते, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण शिबिराचे अध्यक्षस्थान संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी भूषविले.
शिबिराच्या पहिल्या दिवशी स्वयंसेवकांनी शिबिराच्या ठिकाणी आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून मुक्कामाची व्यवस्था केली. रोज सकाळी योगाभ्यासाने दिवसाची सुरुवात केली जात होती. कार्यक्रमाच्या दिवशी कार्यक्रम अधिकारी दिनेश पाटील यांनी संविधानाचे वाचन केले तसेच २६/११ च्या भ्याड हल्ल्या बाबत शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी रॅली काढण्यात आली. निवासी शिबिराच्या माध्यमातून गाव स्वच्छता, कंपोस्ट खड्डा तयार करणे, ओला व सुका कचरा वर्गीकरण, पाणी आडवा पाणी जिरवा या मोहिमेअंतर्गत बंधारा बांधणी यांसारखी उपयुक्त कामे विद्यार्थ्यांनी अत्यंत मनापासून केली.
युवा नेतृत्वावर मार्गदर्शनासाठी महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, मानसिक आरोग्य व तणाव व्यवस्थापनासाठी डॉ. मेघा साजू व डॉ. धनश्री काडू जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांनी मार्गदर्शन केले, तसेच शेतीविषयक माहिती व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शनासाठी तालुका कृषी अधिकारी तन्मय भगत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
‘साप ओळख आणि बचाव’ या विषयावरील विशेष प्रात्यक्षिक वन्यजीव रक्षक अथर्व सैयार व वन्यजीव संवर्धक कपिल जोशी यांनी दिले तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय माने एच.आय.व्ही. जनजागृतीबाबत आणि स्वच्छता व पाणीपुरवठा मिशन कक्ष, जिल्हा परिषद रायगड यांच्यावतीने जयवंत गायकवाड आणि सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले व स्वच्छतेची शपथ दिली.
नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून चित्रकला स्पर्धा, नाटिका, गायन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा तसेच विशेष म्हणजे गावातील महिलांसाठी मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. या खेळांमध्ये सहभागी झालेल्या महिलांना विविध बक्षिसे देण्यात आली. शिबिराला जिल्हा एन.एस.एस. समन्वयक विजय कोंडिलकर व सार्वजनिक विद्यामंदिर, पेण कॉलेजचे एन.एस.एस. अधिकारी संदेश मोरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
१ डिसेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय विशेष निवासी शिबिराची सांगता करण्यात आली. सेवाभाव, शिस्त, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव वाढवणारे हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य जयेश ढेबे, धर्मेश गडकळ, भाग्या काष्टी, लक्ष्मी काष्टी व विभागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले, शिबिराचे नियोजन कार्यक्रम अधिकारी दिनेश पाटील, कपिल जोशी आणि श्वेतल जिंजे यांनी केले तर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच तेजस म्हात्रे आणि निशिकांत कोळसे यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx