Wednesday, October 29, 2025
पेण सुधागड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के
पेण सुधागड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के...

अलिबाग, दि.२० (प्रतिनिधी) :
पेण तालुक्यातील हेटवणे धरण क्षेत्रालगत असलेल्या तिलोरे तर सुधागड तालुक्यातील महागाव परिसरातील देऊळवाडी, कलाकाराई, भोप्याची वाडी, कवेले वाडी येथे भूगर्भातून आवाज येवून जमिन हादरल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० ते १२.३० दरम्यान घडली. यामध्ये पाच घरांचे किरकोळ नुकसान झाले असून, भारतीय हवामान विभाग मुंबई (IMD) नुसार तसेच सातारा कोयनानगर येथील भूमापन केंद्र येथे भूकंपाची नोंद झालेली नाही. यामुळे याबाबत भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांच्यामार्फत गावांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

पेण तालुक्यातील तिलोरे, सुधागड तालुक्यातील महागाव परिसरात बुधवारी रात्री साडेआकरा वाजण्याच्या सुमारास पहिला भूकंपाचा जाणवला. नंतर काही सौम्य धक्के जाणवले. या धक्क्यामुळे घरांमधील भांड्यांची पडझड झाली. धास्तावलेल्या गावकऱ्यांनी तालुका प्रशासनाला याबाबतची माहिती दिली. तर सुधागड तालुक्यातील देऊळवाडी, कलाकाराई, भोप्याची वाडी, कवेले वाडी परिसरात मध्यरात्री भूगर्भातून गूढ आवाज येत असल्याची तक्रार तेथील रहिवाश्यांनी केली आहे.

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री दोन्ही गावांना भेट दिली. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. गावकऱ्यांना पुन्हा धक्के जाणवल्यास तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्राच्या भूकंपमापकावर तसेच सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात असलेल्या भूकंप मापक यंत्रावर या धक्क्यांची कुठलीच नोंद झाली नसल्याची माहिती जिल्हाप्रशासनाला देण्यात आली आहे.

सदर घटनेत पाच घरांचे किरकोळ नुकसान झाले असून जिवीतहानी झालेली नाही. या ठिकाणच्या अधिक सर्वेक्षणासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांना सदर ठिकाणी सर्वेक्षण करण्यास विनंती करण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी  किशन जावळे यांनी केले आहे

पेण तालुक्यातील तिलोरे व सुधागड तालुक्यातील महागाव परिसरातील देऊळवाडी, कलाकाराई, भोप्याची वाडी, कवेले वाडी येथे भूगर्भातून आवाज येवून जमिन हादरल्याची घटना घडली असे नागरिकांनी स्थानिक प्रशासनास कळविले होते. सदर घटना भूकंप नसून याबाबत भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx