अलिबाग : कृषी क्षेत्रातील शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत जलद गतीने आणि परिणामकारकरित्या पोहोचविता यावा अॅग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार करणे बंधनकारक आहे. मात्र या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून, जिल्ह्यातील एकूण ३ लाख ३ हजार ८४४ खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ १ लाख १९ हजार ९५९ खातेदारांनी फार्मर आयडी रजिस्टर केले आहे आहेत. त्यामुळे १ लाख ८३ हजार ८८५ शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत फार्मर आयडी तयार कार्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. याचा परिणाम खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईवर होणार असल्याचे चित्र दिसून येते
शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत जलद गतीने आणि परिणामकारकरित्या पोहोचविता यावा याकरिता कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अॅग्रीस्टॅक योजना राज्यात राबवण्यात येत आहे. यासाठी खातेदार शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार करणे बंधनकारक आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झालेले नाहीत. त्यामुळे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना निधी वितरीत करण्यात अडचणी येत आहेत. ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झालेले नाहीत. त्यांना मदत वाटपात अडचणी येत आहेत.
एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २३ हजार ३५४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात ७ हजार २६३ हेक्टर क्षेत्रावरी शेतीचे नुकसान झाले. ७ कोटी ६४ लाख ४० हजार रुपयांचे मदत अनुदान प्राप्त झाले आहे. मात्र अँग्रीस्टॅकची सक्ती हा मदत वाटपातील मोठा अडसर ठरत आहे.
अॅग्रीस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरीत्या पोहोचण्यासाठी हे डिजिटल फाउंडेशन आहे. कृषी क्षेत्रासाठी सर्व समावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा अॅग्रीस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा देणे, कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होईल. विविध शेतकरी आणि कृषी-केंद्रित योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी अँग्रीस्टॅकसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.