Saturday, December 27, 2025
बिबट्या पकडण्यात रेस्क्यू टिम अपयशी
बिबट्या पकडण्यात रेस्क्यू टिम अपयशी ...

देश महाराष्ट्र

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील नागाव गावातील वाळंज पाराेडा खालच्या आळीत मंगळवारी बिबट्याचा वावर आढळून आला होता. यावेळी बिबट्याने दिवसभर परिसरात दहशत माजवत सहा जणांवर हल्ला केला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्याला पकडण्यासाठी पुणे येथील रेस्क्यू टिम, राेहा येथील वनविभागाच्या रेस्क्यू टिम, अलिबाग वनविभाग कर्मचारी, पोलिस, स्थानिक ग्रामस्थ यांनी दोन दिवस अथक पर्यंत करूनही बिबट्याला पकडण्यात अपयश आले. तसेच बुधवार सकाळपासून गावात कुणाच्याही दृष्टीस बिबट्या पडला नाही. तसेच त्याचे अस्तित्व असलेल्या खुणाही गावात सापडल्या नाहीत. गावातून बिबट्या बाहेर असा अंदाज बांधण्यात येत आहे. रेस्क्यू टिम हात हलवत मागे परतल्या आहेत. आता केवळ वन विभागाचे काही कर्मचारी गावात असून, कुणाला बिबट्या दिसल्यास तत्काळ वनविभागासोबत संपर्क साधण्याचे आवाहन  ग्रामस्थांना करण्यात आले आहे.

अलिबाग जवळच्या नागाव मधील वाळंज पाराेडा खालच्या आळीत भर वस्तीत मंगळवारी सकाळी बिबट्याचा वावर आढळून आला. दिवसभरात बिबट्याने सहा जणांवर हल्ला केला. बिबट्याला पकडण्यासाठी अलिबाग वनविभागाचे कर्मचारी यांच्यासह राेहा येथील वनविभागाच्या रेस्क्यू टिम दाखल झाल्या. मात्र बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच साहित्याचा अभाव यामुळे त्यांच्या मर्यादा उघड झाल्या. परिणामी बिबट्याला पकडण्यासाठी पुणे येथील रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले. मात्र त्यांना बिबट्याला पकडण्यात अपयश आले.

मंगळवारी रात्रीच्या अंधारात बिबट्या पसार झाला. यांनतर मंगळवारी रात्रभर व बुधवारी बिबट्याचा शोध घेण्यात आला. मात्र बिबट्याचे गावात अस्तित्व असल्याच्या कोणत्याच खुणा सापडल्या नाहीत. तसेच मंगळवारी मध्यरात्रीनंतर त्याला कुणीही पहिले नाही. यामुळे बिबट्या गावातून बाहेर गेला असावा असा अंदाज बांधत बिबट्याची शोध मोहीम थांबविण्यात आली आहे. रेस्क्यू टिम हात हलवत मागे परतल्या आहेत. आता केवळ वन विभागाचे काही कर्मचारी गावात असून, नागरिकांनी सतर्क राहावे, बिबट्या दिसल्यास काय करावे याबाबत मार्गदर्शन करीत, बिबट्या दिसल्यास वनविभागासोबत तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले.


नागरिकांमध्ये बिबट्याची भीती कायम

गावात शिरलेला बिबट्या सापडला नसून, त्याची शोध मोहिमही थांबविण्यात आलेली आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर बिबट्याचे कोणतेच अस्तित्व गावात आढळले नसले तरी, पुन्हा बिबट्या गावात आला तर काय करायचे. स्वतःचे व पाळीव प्राण्यांचे रक्षण कसे करायचे? असा प्रश्न त्यांना सतावीत आहे. तसेच जिल्ह्यात बिबट्या सारख्या हिंस्त्र प्राण्याला पकडण्यासाठी जिल्ह्यात प्रशिक्षित मनुष्यबळ व आवश्यक साहित्याचा अभाव असल्याबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx