Wednesday, October 29, 2025
बोटीच्या तांडेलच्या प्रसंगधावनाने १५० प्रवाशांचे प्राण वाचले
बोटीच्या तांडेलच्या प्रसंगधावनाने १५० प्रवाशांचे प्राण वाचले...

अलिबाग : मुंबई ते मांडवा नवीन अजंठा कॅटमरन बोट सेवा शुक्रवारी (दि. ११) चालू झाली आहे. प्रवाशांनी ही सेवा सुरू झाल्याने आनंद व्यक्त केला होता. परंतु, प्रवाशांचा या आनंदावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विरजण पडले आहे. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गेट वे ऑफ इंडियावरून सुमारे दीडशे प्रवाशांना घेऊन निघालेल्या फेरी बोटीत अचानक पाणी शिरले होते. बोटीच्या तांडेलने प्रसंगावधान राखून तातडीने किनाऱ्यावर संपर्क साधला. यांनतर दुसऱ्या बोटींच्या साहाय्याने अजंठा बोटीतील १५० प्रवाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणले गेले.


शुक्रवारी नवीन अजंठा जलवाहतूक करणाऱ्या बोटींची सेवा सुरू करण्यात आली. यासाठी मालकांनी नवीन बोटींची व्यवस्था केली होती. परंतु, बोटीत अचानक पाणी शिरल्याने सकाळी सुरू झालेली ही सेवा सायंकाळपर्यंत कोलमडली. यावेळी सायंकाळी अलिबागच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक होती. सुमारे १५० प्रवासी या अजंठा बोटीत चढले होते. ही बोट मांडव्याच्या दिशेने रवाना झाली आणि गेटवेपासून समुद्रात १ ते दीड नॉटिकल मैलावर पोहोचताच बोटीमध्ये अचानक पाणी शिरण्यास सुरुवात झाली. ही गंभीर बाब बोटीच्या तांडेलच्या लक्षात येताच त्याने तातडीने प्रवाशांना सावधान केले. तात्काळ आपत्ती निवारण करणाऱ्या यंत्रणेला संपर्क करून तातडीने किनाऱ्यावरून स्पीडबोटी बोलावण्यात आल्या आणि बोटीमध्ये असणाऱ्या सुमारे दीडशे प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून गेटवे ऑफ इंडियाच्या किनाऱ्यावर आणण्यात आले. ज्या बोटीमध्ये पाणी शिरले त्या बोटीला देखील मांडवा येथे आणण्यात आले आहे. त्या बोटीचे काम करून पुन्हा ती बोट प्रवासी वाहतूक करण्यासाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांनी अजंठा बोटीत पाणी शिरल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx