अलिबाग : महायुती सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांना मुख्यमंत्री पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत, या मंत्र्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करीत जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोमवारी (दि.११) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या मोर्चादरम्यान शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत, पोलिसांचे बॅरिकेट तोडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यांनतर पोलिसांनी शिवसैनिकांचा रास्ता रोखून धरला, यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. सुमारे तासभर शिवसैनिक व पोलिसांमध्ये बाचाबाची सुरू होती. अखेर शिवसेना पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश देण्यात आला. यांनतर निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिले.
भ्रष्टाचारी मंत्र्यांना मुख्यमंत्री पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत, या मंत्र्यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोमवारी जन आक्रोश आंदोलनाची साद दिली होती. त्यानुसार सोमवारी रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाच्या माध्यमातून धडक देत आंदोलन केले. मोर्चाचे नेतृत्व शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी केले. या मोर्चात माजी आमदार मनोहर भोईर, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, दीपेश्री पोटफोड यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अलिबागमध्ये शिवसेना संपर्क कार्यालय येथून मोर्चाला सुरुवात झाली. सदर मोर्चा अडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील हिराकोट तलाव येथे पोलिसांनी बॅरिगेट लावले होते. सदर बॅरिगेट बाजूला करीत शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली. यांनतर पोलिसांनी लागलीच जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. शिवसैनिकांनी हे प्रवेशद्वार उघडून जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांना सोडावे आशू मागणी लावून धरली. मात्र पोलिसांनी सदर मागणी धुडकावल्याने पोलीस व शिवसैनिकांमध्ये सुमारे तासभर बाचाबाची झाली. यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश दिला.
शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी
जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय...., पन्नास खोके, एकदम ओके..., ये सरकार डरती है! पोलीस को आगे करती है!...., या घोषणेसह इतर घोषण शिवसैनिकांनी दिल्या
निवेदनातून करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या
* गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मालकीच्या डान्स बारमधील बेकायदेशीर कृत्यांमुळे त्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून काढावे.
* कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सभागृहातील पवित्रतेचा भंग केला आहे. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी.
* नाशिक येथील \'हनिन ट्रॅप\' प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई करावी.
* \'वोट चोरी\' प्रकरणातील आरोपींवर निवडणूक आयोगाने तत्काळ चौकशी करून कारवाई करावी.
* गृहनिर्माण मंत्री प्रा. संजय सरनाईक यांच्या \'पीडीडी\' प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी.