अलिबाग : अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानने वतीने ५ व ६ डिसेंबर रोजी सलग ३६ तास व एकत्रित ३०० तास अखंड वाचनयज्ञ उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमांतर्गत अलिबाग तालुक्यातील हाशिवरे हितवर्धक मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयात ५ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी विशेष वाचन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
अक्षरमंच प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून अखंड वाचनयज्ञ या उपक्रमाचे आयोजन मागील तीन वर्षांपासून करण्यात येत आहे. दरवर्षी या उपक्रमामध्ये १ हजार ५०० हून अधिक वाचक व्यासपीठावर येऊन वाचन करीत असतात. हाशिवरे हितवर्धक मंडळाचे सचिव अनिल मोकल यांच्या प्रयत्नातून अखंड वाचनयज्ञ कार्यक्रमात महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावी मधील १०१ हून अधिक विद्यार्थी व्यासपीठावर येऊन प्रत्यक्ष कथा, कविता, लेख यांचे अभिवाचन करणार आहेत.
सदर कार्यक्रमासाठी हाशिवरे हितवर्धक मंडळ सल्लागार सुबोध मोकल, कार्यकारिणी सदस्य निशिकांत मोकल , कवी दिलीप मोकल, मिलिंद मोकल हे उपस्थित राहणार आहेत. डॉ योगेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, हाशिवरेचे प्राचार्य बी. डी. गायकवाड, पर्यवेक्षक एन. डी. प्रबळकर, वैजाळी इंग्लिश मिडीयम स्कूल हाशिवरेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा म्हात्रे व शिक्षक बी. जी शिकारे यांच्या पुढाकारातून हा अभिवाचन उपक्रम राबविला जात आहे.
वाचन संस्कृती वाढीस लागावी या हेतूने अक्षरमंच प्रतिष्ठानचे वतीने विनामूल्य आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये वाचन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आत्मविश्वास यशाचा पाया (लेखक : संकेत खर्डीकर) हे पुस्तक व सहभाग प्रमाणपत्र भेट दिले जाणार आहे..
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx