Saturday, December 27, 2025
महाराष्ट्र विरुद्ध ओडिसा क्रिकेट सामन्यासाठी नागोठणेचे मैदान सज्ज
महाराष्ट्र विरुद्ध ओडिसा क्रिकेट सामन्यासाठी नागोठणेचे मैदान सज्ज...

अलिबाग :  रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील रिलायन्स क्रिकेट मैदानावर १६ ते १९ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध ओडिसा ह्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या कूच बिहार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामना होत आहे, ह्या सामन्यासाठी रिलायन्स नागोठणे विभाग व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन पूर्णपणे सज्ज असल्याचे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव जयंत नाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.

रिलायन्सच्या मैदानावर ह्या पूर्वी देखील रणजी करंडक व कूच बिहार ट्रॉफीचे सामने तसेच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआई) आयोजित विविध स्पर्धेतील सामन्यांचे यशस्वी रित्या आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र विरुद्ध ओडिसा या सामन्याचे नियोजन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन व रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे विभाग यांच्या वतीने करण्यात येणार आहे. हा सामना प्रेक्षकांना पाहण्यासाठी मोफत असणार आहे. सामन्यातून रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना प्रेरणा मिळेल व भविष्यात रायगड जिल्ह्यातून होतकरू खेळाडू तयार होतील अशी आशा जयंत नाईक ह्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. 

मैदानाची पूर्व तयारी पाहणी करण्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव जयंत नाईक, सदस्य ॲड. पंकज पंडित, शंकर दळवी, संदीप जोशी, रिलायन्स हॉर्टिकल्चर विभागाचे प्रमुख शरद पवार, संतोष कोठे, कुमार पिंगळस्कर, संदेश पाटील, अजय वाघमारे उपस्थित होते.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx