नवी मुंबई : महिला विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाने द. आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच विश्वचषक पटकावला. भारत पुरुष व महिला क्रिकेट विश्वचषक पटकावणारा ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यानंतरचा तिसरा संघ ठरला.
भारतीय महिला संघाने महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ गडी गमावून २९८ धावांची मोठी धावसंख्या उभारली. नवी मुंबईत झालेल्या या सामन्यात भारताकडून शेफाली वर्माने सर्वाधिक ८७ धावांची, तर दीप्ती शर्माने ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शेफालीने एकदिवसीय क्रिकेटमधील तिच्या सर्वोत्तम खेळीदरम्यान सात चौकार आणि दोन षटकार मारले. दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाकाने तीन, तर नोनकुलुलेको मलाबा, नाडिन डि क्लर्क आणि चोले ट्रॉयोन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
२९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, त्यानंतर झटपट विकेट्स पडल्या. ब्रिट्स २३ धावांवर धावबाद झाली, तर बॉशला खातेही उघडता आले नाही आणि ती लगेच पॅव्हेलियनमध्ये परतली. लुस ३१ चेंडूंमध्ये २५ धावा काढून बाद झाली, तिला शेफालीने माघारी धाडले. मरिजान कॅप ५ चेंडूंमध्ये केवळ ४ धावाच करू शकली. दीप्तीने जाफ्ताला बाद केले, जिने १६ धावा केल्या. डर्कसन ३७ चेंडूंमध्ये ३५ धावा करून बाद झाली.
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोलवार्टने एका बाजूने किल्ला लढवत १०१ धावांची शानदार शतकी खेळी केली, पण ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. ९८ चेंडूंमध्ये तिने हे शतक पूर्ण केले. अमनजोत कौरने तिचा उत्कृष्ट झेल टिपला. ट्रॉयोन ८ चेंडूंमध्ये ९ धावाच करू शकली. अखेर डि क्लार्क आणि खाका क्रीझवर उपस्थित होत्या, पण संघाला लक्ष्य गाठता आले नाही.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx