Saturday, December 27, 2025
मांडवा बंदर बनलेय धोकादायक
मांडवा बंदर बनलेय धोकादायक...

अलिबाग : गेटवे-मुंबई ते मांडवा-अलिबागला जलमार्गाने जोडणाऱ्या या मार्गावरील मांडवा येथील नवीन जेट्टीच्या पुलाचे खांब निकामी होण्याच्या मार्गावर असल्याने ही जेट्टी कोणत्याही क्षणी कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या जेट्टीवरील पुलाच्या खांबांचे सिमेंट गळून पडल्याने लोखंडी सळ्या बाहेर डोकावत असून, त्याच्या दुरुस्तीकडे महाराष्ट्र सागरी मंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे मांडवा येथे गेल्या काही वर्षांपूर्वी नवीन जेट्टी उभारण्यात आली होती. या जेट्टीचे मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्घाटनही करण्यात आले. मात्र काही वर्षातच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या जेट्टीवरील पुलाच्या खांबांचे सिमेंट गळून पडत असल्याने अनेक ठिकाणी खांबांच्या लोखंडी सळ्या बाहेर डोकावत आहेत. जेट्टीवर मंत्री, आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधी, तसेच प्रतिष्ठित व्यक्तींना घेण्यासाठी व सोडण्यासाठी त्यांच्या चारचाकी वाहने थेट जेट्टीवर जात असल्याने या जेट्टीला त्यापासूनही मोठा धोका संभवतो आहे. यामुळे जेट्टीवर येजा करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

स्वस्त व जलद प्रवास असल्यामुळे या मार्गाने हजारोंच्या संख्येने दररोज पर्यटक व अन्य प्रवासी प्रवास करतात. जेट्टीच्या ठिकाणी जेट्टी ते वाहनतळ ठिकाणी येजा करताना दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, स्तनदा माता व आजारी रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या वाहनांची दोन असून, प्रवाशांची संख्या लक्षात घेता, तीसुद्धा सेवा देण्यासाठी अपुरी व कमी पडत आहे. यामुळे शारिरिक क्षमता कमजोर असलेल्या प्रवाशांना सोबतच्या सामानासह पायी चालत बसपर्यंत किंवा लाँचपर्यत पायी चालत जाताना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. यासोबतच लाँचची वाट पहाणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने गरोदर माता, स्तनदा माता, आजारी रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींना लाँच येईपर्यंत ताटकळते रांगेत उभे राहावे लागते.

मांडवा जेट्टीवरील प्रवासी जेट्टीचे आयआयटी मुंबई यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यासंबंधी शासनाकडे दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविले आहे. त्या कामाच्या निविदा काढून लवकरात लवकर करणार आहोत. यासोबतच इतर असुविधांचा विचार करून पाठपुरावा केला जात असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx