Wednesday, October 29, 2025
माथेरान येथे ई रिक्षा सुरु करण्याची कार्यवाही गतीने करा - पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
माथेरान येथे ई रिक्षा सुरु करण्याची कार्यवाही गतीने करा - पर्यटनमंत्री शंभूराज देसाई...

अलिबाग : माथेरान येथील पर्यटन विषयक पायाभूत सुविधांची कामे स्थानिक प्रशासनाने गतीने करावीत. मा.सर्वोच्च न्यायालयाने माथेरान येथे ई- रिक्षा सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार माथेरान येथे पर्यटन वाढीच्या दृष्टीकोनातून ई-रिक्षा सुरू करण्यासाठीची कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे माथेरान येथील पर्यटन विषयक पायाभूत सुविधा व माथेरान मधील स्थानिक समस्याबाबत आयोजित आढावा बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. बैठकीला आमदार महेंद्र थोरवे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, दूरदृश्यप्रणालीव्दारे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, श्रमिक रिक्षा चालकमालक संघटना माथेरानचे सचिव सुनिल शिंदे, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे यासह इतर संबधित अधिकारी उपस्थित होते.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की,माथेरान हे पर्यटनदृष्ट्या महत्वाचे असलेले शहर आहे. येथे पर्यटनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाखो पर्यटक भेटी देत असतात हे लक्षात घेता येथील स्थानिक पर्यटन विषयक महत्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधांची कामे गतीने करण्यात यावीत. वाहनतळासाठी आरक्षित असलेला भूखंड विनामोबदला माथेरान नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याकरिता महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाने कार्यवाही करावी तसेच या ठिकाणी असलेली अतिक्रमणे त्वरीत हटवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. माथेरान पर्यावरण संवेदनशील सनियंत्रण समितीने ऑफलाईनही  बैठक आयोजित करावी, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx