Friday, July 11, 2025
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूकीचा शिमगा
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूकीचा शिमगा...

अलिबाग : मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण व‌ वाहतूकीच्या योग्य नियोजनाचा फटका रविवारी चाकरमानी व पर्यटकांना बसला. होळीचा सण साजरा करून, मुंबई, ठाण्याकडे परतणारे चाकरमानी मुंबई गोवा महामार्गावर तासनतास अडकले. महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. माणगाव जवळ तर आठ ते नऊ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलादपूर ते पळस्पे हे १५५ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना सुमारे सात तासांचा वेळ लागत होता.


गुरुवारी होळी, शुक्रवारी धुलीवंदन हे सण साजरे करण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या गावी आले होते. तसेच या सणांना लागून शनिवार व रविवार आल्याने पर्यटकही कोकणातील होळी सण व पर्यटन स्थळे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. चाकरमानी व पर्यटक रविवारी परतीच्या प्रवासाला निघतील व महामार्गावर वाहनांच्या वर्दळीत वाढ होणार असल्याची कल्पना प्रशासनाला होती. मात्र वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी योग्य नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र दिसून आले.


मागील १४ वर्षांपासून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. माणगाव बायपासचे कामही रखडले आहे. ठिकठिकाणी मोऱ्यांची कामे अपूर्ण आहेत. याचा मोठा फटका वाहनचालकांना बसला. महामार्गावरील आमटेम, नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव येथे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. माणगाव जवळ तर आठ ते नऊ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलादपूर ते पळस्पे हे १५५ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना सुमारे सात तासांचा वेळ लागत होता. वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलीसांच्या नाकीनऊ येत होते.


रविवारी महामार्गावरील वर्दळीत वाढ होणार याची कल्पना असल्याने दुपारी १२ ते रात्री १२ पर्यंत महामार्गावर जड, अवजड वाहतूकीला बंदी घालण्यात आली होती. मात्र हे बंदी आदेश मोडून काही वाहनचालकांनी जड, अवजड वाहने महामार्गावर नेल्याने वाहतूक कोंडीत भर‌ पडली होती.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx