मुलींच्या शिक्षणाला उभारी देण्याचा प्रयत्न - चित्रलेखा पाटील...
अलिबाग : देशासह राज्यात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. महिला व मुलींची परिस्थिती भयावह आहे. मुलींच्या शिक्षणाला थांबविण्याचे काम काही मंडळी करीत आहेत. मात्र वृत्तीला रोखण्यासाठी तसेच मुलींच्या शिक्षणाला गती देण्यासाठी सायकल देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चाक हे प्रगतीचे प्रतिक आहे. त्यामुळे सायकली घेऊन अशाच पुढे जा असे आवाहन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी विद्यार्थींनींना केले. मुलींच्या शिक्षणाला उभारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे ही त्या म्हणाल्या.
अलिबागमधील कुरुळ येथील क्षात्रैक्य समाज हॉलमध्ये अलिबाग व मुरूड तालुक्यातील दोनशेहून अधिक मुलींना सायकल देण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शनिवारी(दि. 08) हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, सर्व्हायव्हल टेक्नॉलॉजिस् प्रा. लि. या कंपनीच्या सीएसआर प्रमुख राधा आगरवाल, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका संजना कीर, ॲड. त्रिशा, सीएफटीआयच्या रेश्मा शेजपाल, शरयू अधिकारी, रश्मी वाळंज, नागेश्वरी हेमाडे, अनिता पवार तसेच ॲड. परेश देशमुख, अमित देशपांडे आदी मान्यवरांसह महिला आघाडीच्या पदाधिकारी, सदस्या, अलिबाग व मुरूडमधील विद्यार्थीनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.