मुंबई : बंगालच्या उपसागरावरील निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तीव्र होऊन खोल कमी दाबाचा पट्टा बनला आहे. आता त्याचे रूपांतर मोंथा चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. राज्यातील सागरकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग ३५ ते ४५ किमी प्रतितास राहील. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ५५ किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो.
हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दलाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत आज हवामान ढगाळ आहे, तर पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह उपनगरातील काही भागांत रविवारीही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. आजही संध्याकाळी अशीच परिस्थिती राहणार असल्याची माहिती आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx