अलिबाग : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील २ हजार ४७३ शाळांमध्ये एकूण ८४ हजार ९६ विद्यार्थी नियमित शिक्षण घेत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व सर्वसमावेशक शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. डिजिटल शिक्षण, ई-लर्निंग साहित्य, स्मार्ट क्लासरूम, तसेच क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन दिले जात आहे. शिक्षकांमार्फत नियमित मूल्यमापन, अभ्यासक्रम पूर्णता आणि पूरक अध्यापनावर लक्ष केंद्रित केले जात आहे.
शालेय पोषण आहार योजना, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश वितरण आणि शिष्यवृत्ती योजनांचा लाभही विद्यार्थ्यांना दिला जात आहे. विशेषतः दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती वाढावी यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तसेच शाळा गळती रोखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. आगामी काळात शैक्षणिक सुविधांमध्ये अधिक सुधारणा करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संकल्प असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी ललिता दहीतुले यांनी दिली. तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा मिळत असून पालकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx