Wednesday, October 29, 2025
रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी गिरविणार डिजिटल गुणवत्तेचे धडे
रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी गिरविणार डिजिटल गुणवत्तेचे धडे...

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अध्ययन अध्यापनात सुलभता यावी व त्यांची गुणवत्ता वाढ व्हावी यादृष्टीने राजिप शिक्षण, प्राथमिक या नावाने एका डिजिटल शैक्षणिक ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थांना एक क्लिकवर  शिक्षणाचे पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक स्तर रचनेनुसार अध्ययन, अध्यापन, खेळ, कृती, सहशालेय उपक्रम, स्पर्धा परीक्षा यासह इतर शैक्षनिक माहिती उपलब्ध होणार आहे, या ॲपचे लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.


रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या सहाय्याने राजिप शिक्षण प्राथमिक नावाचे डिजिटल ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून NEP-2020 च्या मार्गदर्शक तत्वानुसार पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर रचनेनुसार अध्ययन अध्यापन, खेळ, कृती, सहशालेय उपक्रम, स्पर्धा परीक्षा, माझा अभ्यास, तंत्रशिक्षण असे मुख्य पेज असून, पुढे विषय व अध्ययन दैनंदिन पाठ योजना, सहायक उपक्रमाची रचना ॲपमध्ये आहे. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ग्रेडिंग अचूक व थेट करणे सुलभ जाईल. एआय सोबतच विविध सोशल मीडियाच्या जोडण्या ॲपमध्ये देण्यात आल्या आहेत.


या ॲपच्या लोकार्पण समारंभ कार्यक्रमासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम, प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांच्यासह या अँ च्या निर्मितीत व ई साहित्य तयार करण्यात मदत करणारे शिक्षक उपस्थित होते. या उपक्रमासाठी नोडल अधिकारी म्हणून शिक्षक सुभाष राठोड यांची नियुक्ती करण्यात आली होती.


हे शैक्षणिक डिजिटल प्लॅटफॉर्म असून यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना दैनंदिन अध्ययन अध्यापन करणे सुलभ होणार आहे. व्हिडिओ, पीपीटी, कृतीपत्रिक, क्विज, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असे कार्य या अँपच्या माध्यमातून सुलभ होईल असा विश्वास आहे.

: पुनिता गुरव,

प्राथमिक शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx