अलिबाग :
रायगड जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगारव्यतिरिक्त इतर फरकाची रक्कम दाखवून १ कोटी १९ लाख रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या पाणी पुरवठा विभाग अलिबाग उपविभागातील वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरडे यांच्याविरुद्ध जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, नाना कोरडे याने केलेल्या गैरव्यवहाराची अधिक चौकशी पाच सदस्यीय समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
अलिबाग उपविभागातील वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरडे याने ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगारव्यतिरिक्त इतर फरकाची रक्कम दाखवून सदर फरकाची रक्कम आपल्या व पत्नीच्या खात्यात वळती करून हा गैरव्यवहार केला आहे. हा गैरव्यवहार करताना धनादेशांवर वरिष्ठ अधिकारी यांच्या बनावट सह्या केल्या आहेत. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महादेव टेळे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
नाना कोरडे हा पाणी पुरवठा विभागात कार्यरत होण्याआधी महिला व बालविकास विभागाच्या अलिबाग व म्हसळा प्रकल्प येथे २०२० पासून कार्यरत होता. याठिकाणीही त्याने असाच गैरव्यवहार केला आहे का? याची तपासणी समितीचे सदस्य करीत आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेचे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी नाना कोरडे याच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई केली आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx