अलिबाग : रायगड जिल्ह्यात कुपोषणाचे शुल्कसाट कायम असून, प्रशासनाच्या उदासिनतेमुळे कुपोषित बालकांची संख्या वाढली असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. कुपोषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करम्यात येत असूनही कुपोषण अटोक्यात आलेले नाही. महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात ४५४ कुपोषित बालके आढळून आली असून, यामधील ६१ बालके तीव्र कुपोषित असून, ३९३ बालके सौम्य कुपोषित आहेत.
जिल्हा महिला व बालकल्याण विभाग तसेच आरोग्य विभागाकडून सहा वर्षापर्यंतच्या बालकांची तपासणी करण्यात येते. या तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील कुपोषणाची आकडेवारी चिंताजनक आहे. तपासणी करण्यात आलेल्या १ लाख ६ हजार १३० बालकांपैकी ४५४ बालके कुपोषित आढळून आली आहेत. यामधील ६१ बालके तीव्र कुपोेषित तर ३९३ बालके सौम्य कुपोषित आहेत.
कुपोषणावर मात करण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी कोट्यवधींचा खर्चही करण्यात येतो. अंगणवाडी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये पोषण आहार पुरविण्यात येतो. तसेच सरकारी रुग्णालये व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत कुपोषित बालकांवर उपचार करण्यासाठी ठिकठीकाणी बाल संगोपन केंद्र स्थापण करण्यात आली आहेत. मात्र असे असूनही जिल्ह्यात कुपोषणावर मात करण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसून येते.
आदिवासी विभागाकडून पोषण आहार योजनेसाठी केल्या जाणार्या आर्थिक तरतुदीत झालेली घट, कुपोषण निर्गामूलनासाठी गाव पातळी, तालुका पातळीवरील समित्याच अस्तित्वात नसणे, शासनाकडून वाटप करण्यात येणारी पाकीट खाण्यास मुलांची उदासिनता हि देखील कुपोषण समस्येमागील काही महत्वाची कारणे असल्याची बाब समोर आली आहे.
जिल्ह्यातील बालके दृष्टीक्षेपात
* तपासणी केलेली बालके - १ लाख ६ हजार १३०
* तीव्र कुपोषित बालके - ६१
* सौम्य कुपोषित बालके - ३९३
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx