अलिबाग : जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध मोहीम अभियान १७ नोव्हेंबर ते जानेवारी ते २ डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान आशा स्वयंसेविका, स्वंयसेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेणार असून, रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील २३ लाख ३० हजार ८७१ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी १ हजार ९९५ पथके तयार करण्यात आली आहेत. ३७५ पर्यवेक्षकांच्या माध्यमातून मोहिम राबविण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोग संदर्भात संपुर्ण शारिरीक तपासणी करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात ३८८ कृष्ठरुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
या मोहिमेअंतर्गत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत. नवीन कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात ३८८ सक्रीय कृष्ठरुग्ण
रायगड जिल्ह्यात ३८८ कृष्ठरुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. यामध्ये अलिबाग तालुक्यात २६ कृष्ठरुग्ण असून, कर्जत ४६, खालापूर ४२, महाड ३३, माणगाव २८, म्हसळा ८, मुरुड ३, पनवेल ग्रामीण ४६, पनवेल शहर ४३, पेण ३२, पोलादपूर ३, रोहा २१, श्रीवर्धन १०, सुधागड ३३, तळा ४, उरण १० कृष्ठरुग्ण आहेत.
कुष्ठरोगाची लक्षणे
शरीराच्या कुठल्याही भागावर फिकट लालसर न खाजणारा बधीर चट्टा-डाग, त्या ठिकाणी घाम न येणे, जाड बधीर तेलकट त्वचा, त्वचेवर लहान लालसर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्णपणे बंद करता न येणे, हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल निसटणे, हाताची व पायाची बोटे वाकडे असणे,) हात मानेपासून व पाय घोट्यापासून लुळा पडणे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx