अलिबाग : दिवाळी सुट्टीत मोजमज्जा करण्यासाठी पर्यटकांनी रायगड जिल्ह्याला पसंती दिली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मंदावलेला पर्यटन व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत असून, जिल्ह्यातील हाॅटेल, काॅटेज, लाॅज फुल्ल झाले आहेत. हाॅटेल व्यवसाय तेजीत असला तरी जिल्ह्यातील पर्यटनपूरक इतर व्यवसाय मात्र अद्यापपर्यंत पूर्वपदावर आले नसल्याचे दिसून येते.
पावसामुळे जून महिन्यापासून जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या रोडावली होती. मात्र आता दिवाळी सुट्टीत पर्यटकांची पाऊले रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थलांकडे वाळू लागली आहेत. यामुळे पर्यटन व्यवसायावरील अवकळा दूर होत आहे. एकीकडे हाॅटेल, काॅटेज, लाॅज फुल्ल झाले असताना इतर पर्यटनपूरक व्यवसाय मात्र पूर्वपदावर आले नसल्याचे दिसून येते. समुद्र किनारी चालणारे बोटिंग, बनाना रायडिंग तसेच इतर पाण्यातील खेळ करण्यास पर्यटक धजावत नाहीत. तसेच समुद्र किनाऱ्यावरील घोडेस्वारी तसेच उंट सवारी व्यवसायही अद्यापपर्यंत पूर्व पदावर आलेला नाही.
समुद्रकिनारी पर्यटनास पर्यटकांची पहिली पसंती
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड व श्रीवर्धन या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक दाखळ झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील मांडवा, किहिम, वरसोली, अलिबाग, नागाव, रेवदंडा येथील हाॅटेल, काॅटेज फुल्ल झाले आहेत. तर मुरुड तालुक्यातील काशिद व मुरुड या समुद्रिकानारी ८० टक्के हाॅटेल व काॅटेज फुल्ल झाले आहेत. श्रीवर्धन मधील दिवेआगर व हरिहरेश्वर येथील हाॅटेल व काॅटेज जवळपास फुल्ल झाले आहेत.
जून महिन्यापासून समुद्र किनाऱ्यावरील पर्यटनव्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. मात्र मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात पर्यटक पुन्हा दाखल होऊ लागले आहे. यामुळे पर्यटन व्यवसाय पूर्व पदावर येऊ लागला आहे. मात्र अद्याप पर्यटन व्यवसायावर आधारित काही व्यवसाय अद्यापपर्यंत पूर्वपदावर आलेले नाहीत.
- उमेश कवळे
अध्यक्ष, हाॅटेल, काॅटेज संघटना
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx