Wednesday, October 29, 2025
रायगड पोलिसांनी डिजिटल अरेस्ट प्रकरणाचा केला भांडाफोड
रायगड पोलिसांनी डिजिटल अरेस्ट प्रकरणाचा केला भांडाफोड...

अलिबाग : कार्पोरेट स्तरावरील टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून वृद्धांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हे टोळीचा पर्दाफाश रायगड पोलिसांनी केला आहे. अलिबाग येथील एका वृद्धाला डिजिटल अरेस्ट करून त्याची ६६ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे. या आरोपींकडून डिजिटल अरेस्टचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल ६ हजार १७५ मोबाईल सिम कार्ड, ३५ मोबाईल, १ आयपॅड, ३ लॅपटॉप, १ व्हि. पी. एन. स्विच पोर्ट, ५ रबर स्टॅम्प जप्त केले आहेत. तसेच आरोपींची ११२ बँक अकाउंट खाती गोठविण्यात आली आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी गुरुवारी (दि.३१) पत्रकार परिषदेत दिली.

अलिबाग येथील वयोवृद्ध इसमाला ५ मे रोजी एका व्यक्तीने फोन करून तो टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडियाकडून बोलत असल्याचे सांगून वृद्ध इसमाला ९ नंबर डायल करण्यास सांगितले. त्यानंतर सदर आरोपीने त्यांना व्हिडिओ कॉल करून आपण सीबीआय कडून बोलत असल्याचे सांगत तुम्ही मनी लॉड्रि़ग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले असून, तुम्हाला यातून बाहेर पडायचे असेल तर पैसे द्यावे लागतील असे धमकावले. यांनतर वेळोवेळी फोन करून आरोपींनी वृद्ध इसमाकडून ६६ लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात भरण्यास सांगितले. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर २३ मे रोजी संबंधित वृद्धाने सायबर विभागात तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक आँचल दलाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिजित शिवथर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रिजवाना नदाफ, पोलिस निरीक्षक अमोल मोहिते, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय मोहिते यांच्या पथकाने तपास सुरू केला. चौकशी दरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. या प्रकरणात आरोपींनी बनावट कॉल सेंटर कंपन्या स्थापन केल्याची माहिती प्राप्त झाली. या कंपन्यांच्या माध्यमातून नागरिकांना फोन करून त्यांना डिजिटल अरेस्ट करुन त्यांची फसवणूक करण्यात येत होती. रायगड पोलिसांनी नागरिकांची फसवणूक करणारे पूर्ण रॅकेट उघडकीस आणले आहे.‌ तसेच ११ जणांना अटक केली आहे. या आरोपींच्या चौकशीतून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आर्तविली जात आहे. 


या प्रकरणात उत्तर प्रदेश येथील अभय संत प्रकाश मिश्रा हा मुख्य आरोपी असून तो उत्तर प्रदेश येथील रहिवाशी आहे. त्याच्यासह उत्तर प्रदेश येथून आणखी ६ जणांना अटक करण्यात आली असून, हैदराबाद येथून दोन, आसाम व राजस्थान येथील‌ प्रत्येकी एका‌ला अटक करण्यात आली आहे.


* विविध कंपन्यांसाठी डेटा सेंटर व्होस्ट करणाऱ्या कंपनीकडून डेटा स्पेस व डोमेन घेऊन आरोपींनी कॉल सेंटर तसेच इतर कंपन्या स्थापन केल्या होत्या. या कंपन्यांना दूरसंचार विभागाच्या तत्त्वांनुसार अंतिम पडताळणी न करता टेलिकॉम कंपनीद्वारे एसआयपी कनेक्शन देण्यात आले होते. या एसआयपी लाईन कनेक्शन‌साठी उत्तर प्रदेश राज्यातील इंजिनिअर असलेला अभय मिश्रा हा मुख्य भूमिका निभावत होता. या माध्यमातून तो पाकिस्तान, कॅनडा, नेपाळ, चीन, बांगलादेश येथील नागरिकांसोबत संपर्कात होता. त्यांना एसआयपी कनेक्शन देऊन भारतीय नागरिकांची फसवणूक करण्यात येत होती. एसआयपी लाईन हे ऑनलाइन व्हॉईस कॅमिनिकेशन सत्र सक्षम करीत असून, वापरकर्ते फोन लाइन, व्हिडिओ कॉल, मेसेज द्वारे एकमेकांशी संवाद साधू शकतात. एसआयपी लाईनचा वापर कर्ज फसवणूक, धमकी देणारे कॉल, बनावट कॉल, खंडणी कॉल साठी केला जात आहे. अलिबाग येथील प्रकरणात एसआयपी कॉलचा वापर करण्यात आला होता. टेलिकॉम कंपन्या ही सेवा प्रदान करताना पूर्ण पडताळनिधिवाय एसआयपी सेवा प्रदान करतात. यामुळे फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. कंपन्या बनावट आहेत हे माहित असूनही कंपन्यांना एसआयपी लाईन देणाऱ्या जिओ कंपनीचे सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत असणारे बलमोरी विनयकुमार राव व गंगाधर गंगाराम मुट्टन या दोघांना‌ पोलिसांनी अटक केली आहे.


* पोलिसांनी आरोपींकडून तब्बल ६ हजार १७५ सिम कार्ड जप्त केले आहेत. यामध्ये जिओ कंपनीचे १ हजार ७०९, एअरटेल २ हजार ३३४, व्हिआय ७९०, आयडिया ४३५, बीएसएनएल २२४, व्होडाफोन ५९७, टाटा डोकोमो २५, युनिनॉर १२, एअरसेल २५, रिलायन्स ११, आंतरराष्ट्रीय १३ सिमकार्ड पोलीसांनी जप्त केले आहेत. अटक आरोपींपैकी मोहसीन मियां खान याने हे सिमकार्ड सायबर गुन्हे करण्यासाठी वापरले जात असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. आरोपींना इतक्या मोठ्या प्रमाणात सिम कार्ड प्राप्त झाले कसे, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


* अटक आरोपींपैकी मुख्य अभय मिश्रा हा बनावट कागदपत्रे बनवून नेपाळचे कायमचे नागरिकत्व मिळविण्याच्या प्रयत्नात आल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. मिश्रा याला युएसडी व बिटकॉइन द्वारे पैसे मिळत होते. यामुळे या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग ची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच मिश्रा यांच्या नावावर उत्तर प्रदेश येथे स्थावर मालमत्ता असून, नेपाळ येथे त्याचा बंगला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx