अलिबाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकिय सेवेत सामावून घ्यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीने मंगळवार (दि.१९) पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात रायगड जिल्ह्यातील ६०० हून अधिक अधिकारी कर्मचारी सहभागी होत त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याचा परिणाम सरकारी रुग्णालयातील अत्यावश्यक सेवेसह अतिदक्षता विभाग, लसीकरण, औषध वितरण सेवेवर होणार आहे. सद्यस्थितीत डायलेसिस आणि नवजात कक्ष या दोन विभागातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले नसून, पुढील दोन दिवसात शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास या विभागातील कर्मचारी बेमुदत आंदोलनातं सहभागी होतील, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीचे रायगड अध्यक्ष विकास धुमाळ यांनी दिली आहे.
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकिय अधिकारी, विशेषज्ञ, समुदाय आरोग्य अधिकारी, जिल्हा समन्वयक, जिल्हा लेखाधिकारी, औषध निर्माण अधिकारी, अधिपरिचारीका, परिचारीका, डाटा एन्ट्री ऑपरेटर यासह इतर कर्मचारी मागील १५ ते २० वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून कंत्राटी तत्वावर काम करीत आहेत. या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकिय सेवेत सामावून घेण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यासाठी संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलन करण्यात आले आहे. त्यानंतर शासनाने १० वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजन करण्याचे जाहिर करून, १४ मार्च २०२४ रोजी अध्यादेश काढला. मात्र त्याची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमधून असंतोष निर्माण झाला आहे.
दरम्यान, शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकिय सेवेत सामावून घ्यावे, १० टक्के मानधन वाढ व लॉयल्टी बोनस लागू करावा, ग्रच्यूअटी मिळावी यासह विविध १८ मागण्यांसाठी संघटनेचे आंदोलन सुरु केले होते. यामध्ये शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले होेते. त्यानंतर आझाद मैदानावर जुलै महिन्यात आंदोलन सुरु केले होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार अद्यापही कर्मचाऱ्यांना शासकिय सेवेत सामावून घेण्याबाबत शासकिय पातळीवरून हालचाली सुरु झाल्या नाहीत. त्यामुळे कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
त्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कर्मचारी यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx