Sunday, June 1, 2025
लाचेची मागणी करणाऱ्या पोलादपूर तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल
लाचेची मागणी करणाऱ्या पोलादपूर तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल ...

अलिबाग :  जमिनीच्या दाखल दाव्याचा निर्णय देऊन आदेशाची प्रत देण्याकरीता तक्रारदाराकडे २ लाख ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलादपूर तहसीलदार कपिल तुकाराम घोरपडे यांच्याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलादपूर तालुक्यातील पार्टेकोंड येथील एका जमिनीसंदर्भात पोलादपूर तहसीलदार यांच्याकडे दावा दाखल आहे. यातील तक्रारदार यांना अखत्यारपत्र दिलेल्या जमिनीचे तफावतीबाबत सदर दावा दाखल आहे. सदर दाव्याचा निर्णय देवून आदेशाची प्रत देण्याकरीता तहसीलदार कपिल घोरपडे यांनी तक्रारदाराकडे ३१ जानेवारी रोजी ३ लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी ३ फेब्रुवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. तक्रारीच्या अनुषंगाने ४ फेब्रुवारी रोजी पडताळणी केली. यावेळी तडजोडीअंती २ लाख ५० हजार रुपये रक्कम ठरली होती. 

५ फेब्रुवारी व १८ फेब्रुवारी रोजी तहसीलदार कपिल घोरपडे यांच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. मात्र तहसीलदार यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. यामुळे तहसीलदार कपिल घोरपडे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलादपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सदर कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे पोलीस अधीक्षक  शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रायगड उपअधीक्षक शशिकांत पाडावे, पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, पोलीस निरीक्षक संतोष भिसे यांच्या पथकाने केली आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx