देश महाराष्ट्र
अलिबाग : रायगड जिल्ह्याला गुन्हेगारीचा विळखा पडला आहे. रायगड पोलीस क्षेत्रात २०२५ या मागील वर्षभरात २ हजार २८२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, चोरी, बलात्कार, विनयभंग, दंगल, अपहरण यासह इतर गुन्ह्यांचा भरणा आहे. जिल्हा पोलीस दलानेही गुन्ह्यांची उकल करताना दमदार कामगिरी केली असून, तब्बल ९० टक्के म्हणजे २ हजार ६४ गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळविले आहे.
मुंबईपासून जवळ असलेला रायगड जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. नवनवीन प्रकल्प येथे येत आहेत. औद्योगिकीकरणातही जिल्हा अग्रेसर आहे. यामुळे नागरीकरणही वाढत आहे. याचबरोबर गुन्हेगारांचा शिरकावही मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यात दिवसाला ६ ते ८ गुन्ह्यांची नोंद होत आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रायगड पोलिसांनी कंबर कसली आहे. अधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्याचे
प्रमाण वाढले आहे.
रायगड पोलीस दलाच्या हद्दीत २०२५ वर्षभरात २ हजार २८२ गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोद झाली होती. यात खून ३२, जीवे ठार करण्याचा प्रयत्न करणे २७, दरोडा, चोरी, घरफोडी ४४५, दंगल १३२, बलात्कार १३६, विनयभंग १५६, अपहरण १२१ तर इतर १ हजार २३३ गुन्ह्यांचा समावेश आहे. यापैकी ९० टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात रायगड पोलिसांना यश आले असून, केवळ १० टक्के गुन्ह्यांचा तपास प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिली आहे.
गुन्हे उकल प्रमाण दृष्टीक्षेप (वर्ष २०२५)
एकूण गुन्हे : २ हजार २८२
गून्ह्यांची उकल : २ हजार ६४
तपास प्रलंबित असलेले गुन्हे : २१८
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx