मुंबई : राज्यातील मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करण्यासाठी शनिवारी (दि.१) विरोधकांनी मुंबई भव्य असा मोर्चा काढला. दोन्ही ठाकरे बंधू आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक दिग्गज नेते हे \'सत्याचा मोर्चा\' यामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
दक्षिण मुंबईतील फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय इथवर हा मोर्चा काढण्यात आला होता. ज्यानंतर इथे प्रमुख नेत्यांची भाषणं पार पडली. यावेळी सुरुवातीलाच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मतदार याद्यांमधील दुबार मतदारांची थेट नाव घेत एकच खळबळ उडवून दिली.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा आणि ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. दिल्लीपर्यंत समजण्याचा आणि समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे. मोठ्या ताकदीने आज तुम्ही मोर्चाला जमला त्याबद्दल आभार आहोत. मतदार यादीत दुबार मतदार आहेत. सर्व पक्षाचे लोक यादीत दुबार मतदार असल्याचे बोलतायेत मग निवडणूक घेण्याची घाई का? मतदार याद्या पारदर्शक केल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीतील साडे चार हजार मतदारांनी मलबार हिल मतदारसंघातही मतदान केले आहे. प्रभाकर तुकाराम पाटील, राम भोईर, पुंडलिक भोईर या लोकांनी त्यांच्या मतदारसंघातही मतदान केले, मलबार हिलमध्येही मतदान केले. अशाप्रकारे लाखो मतदार आहेत असा आरोप त्यांनी केला.
उद्धव ठाकरे सभेत म्हणाले की, मी आणि राज दोघंही भाऊ एकत्र आलो आहोत. पण आम्ही तुमच्यासाठी आलो आहोत. मराठी माणसांसाठी. हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलो आहोत. आम्ही पुढे जात असताना तुम्ही साथ दिली पाहिजे. साथ देण्याची धमक असेल तर हाताची मूठ वळवून दाखवा. हा फोटो मतचोराच्या बादशाहकडे पाठवा. मतचोरी केली तर ही मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx