Sunday, June 1, 2025
शनिवारी रायगडावर शिवपुण्यतिथी सोहळा
शनिवारी रायगडावर शिवपुण्यतिथी सोहळा...

अलिबाग : किल्ले रायगड येथे शनिवारी (दि.१२) ३४५वी शिवपुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन श्री. शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे  करण्यात आले आहे. यानिमित्त ११ व १२ एप्रिल रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तसेच समाधी स्थळाला अभिवादन करतील, अशी माहिती श्री. शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी सोमवारी (दि.७) अलिबागमध्ये पत्रकार परिषदेत दिली.


श्री. शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे शिवपुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ११ एप्रिल रोजी रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला दीपवंदना दिली जाणार आहे. तसेच राजसदर या ठिकाणी शाहीर सुरेशराव सूर्यवंशी यांचा ही रात्र शाहीरांची‌ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जगदीश्वर प्रांगणात कीर्तन आणि जागर हे कार्यक्रम पार पडतील.


१२ एप्रिल रोजी राजसदर येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात येणार आहे. सदर पालखी शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावर नेण्यात येईल. यानंतर समाधीस्थळाला अभिवादन केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. दरम्यान १२ एप्रिल रोजी सकाळी मंडळातर्फे दुर्ग अभ्यासक नीलकंठ पाटील, अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज उदयसिंह होळकर, निवृत्त लेफ्टनंट संजय कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.


शिवपुण्यतिथी कार्यक्रमाला सुमारे १० हजार शिवप्रेमी नागरिक उपस्थित राहतील. रायगडच्या पायथ्याशी शिवप्रेमींच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. गडावर आरोग्य पथके तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती रघुजीराजे आंग्रे यांनी दिली आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx