शरीरसौष्ठवपटू प्रणव पुजारीचा सत्कार...
अलिबाग : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शरीरसौष्ठवमध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या तालुक्यातील गोंधळपाडा येथील प्रणव उमेश पुजारी याचा रविवारी (7 डिसेंबर) गोंधळपाडा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
गोवा येथे नुकत्याच झालेल्या आयसीएन इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेत तालुक्यातील गोंधळपाडा येथिल प्रणव उमेश पुजारी याने वेगवेगळ्या कॅटॅगिरीत घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे २०२६ मध्ये आयसीएनच्या वतीने होणाऱ्या शोसाठी प्रणवने पात्रता मिळवली आहे. या स्पर्धेत प्रणवने बॉडीबिल्डिंग कॅटॅगिरीत तिसरा क्रमांक, पुरुष फिजिक कॅटॅगिरीत चौथा क्रमांक, पुरुष फिटनेस मॉडेल कॅटॅगिरीत सुवर्ण पदक, प्रो क्वालिफिकेशन स्पर्धेत ३० स्पर्धकांतून तिसरा येण्याचा मान पटकावला आहे. या त्याच्या कामगिरीबद्दल त्याची पुढील वर्षी गोवा येथे होणाऱ्या आयसीएन शो २०२६ साठी निवड झाली आहे. प्रणवने अनेक जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक बक्षीस पटकावली आहेत.
या त्याचा कामगिरीबद्दल गोंधळपाडा ग्रामस्थ आणि अलिबागमधील शरीरसौष्ठवपटूंकडून कौतुक होत आहे.
रविवारी सायंकाळी गोंधळपाडा समाजमंदिर येथे ग्रामस्थांतर्फे प्रणव पुजारी याचा जाहीर सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन प्रणव याचा सन्मान करण्यात आला. वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश गावडे यांच्याप्रमुख उपस्थितीत हा सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उद्धव भितळे, ग्रामस्थ प्रसाद गोतावडे, सतीश पुजारी, भास्कर पुजारी, अमित पुजारी, दिलीप सुद, राजेंद्र जाधव, पराशर भितळे, प्रणव याचे कुटुंबिय, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना सरपंच गणेश गावडे व ग्रामस्थांनी प्रणव याच्या कामगिरीचे कौतुक करुन त्याला शुभेच्छा दिल्या. आपले कुटुंबीय, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराने आपल्याला नेहमीच प्रोत्साहन दिले असल्याचे सांगून प्रणव याने सर्वांचे आभार मानले.
शरीरसौष्ठवपटू प्रणव पुजारी याने प्रतिकूल परिस्थितीतून शरीरसौष्ठव क्षेत्रात मोठे यश मिळविले आहे. वडिलांच्या अकाली निधनानंतर त्याच्या आईने अलिबाग शहरात वृत्तपत्र विक्री करून आपल्या दोन मुलांना उच्च शिक्षण दिले आहे. प्रणव याने सिव्हिल इंजिनीअरिंगपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून तो सध्या बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे.