सिंधुदुर्ग : शिकार करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा सहकार्याने शिकार समजून झाडलेली गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे घडली आहे. सचिन मर्गज (वय २८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
सचिन मर्गज व सिप्रियान डान्टस हे काल शुक्रवारी सकाळी ओवळीये येथे शिकारीला गेले होते. सिप्रीयन हा बंदूक घेऊन शिकारीच्या उद्देशाने उभा होता तर सचिन हा जंगलात हाकारा देण्यासाठी गेला होता. जंगलातील झुडपामध्ये हालचाल झाल्याचं दिसून आल्याने सिप्रियान याने त्या दिशेने गोळी झाडली. यावेळी काही लांडोर पक्षी उडून बाजूला गेले व त्याचवेळी \'आई गं...\' अशी किंचाळी ऐकू आली. त्यामुळे सिप्रियान याने त्या ठिकाणी धाव घेतली असता सचिन मर्गजच्या शरीरात गोळी घुसल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत कोसळलेला दिसून आला. त्याच्या तोंडावर तसेच छातीत छर्रे घुसले होते. यात अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. .
मृत युवकाच्या वडिलांनी सावंतवाडी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी सिप्रियान अॅन्थॉनी डान्टस (35, रा. कोलगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx