Wednesday, February 25, 2026
सत्यजित बडे यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड
सत्यजित बडे यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड...

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांची भारतीय प्रशासकीय सेवेत (आय.ए.एस.) निवड झाली आहे. सन २००० मध्ये सत्यजित बडे यांची महाराष्ट्र विकास सेवेत निवड झाली होती. तेव्हापासून आजतागायत त्यांनी विविध ठिकाणी गट विकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदी विविध पदांवर काम केले आहे. 

सन १९७३ मध्ये कोल्हापूर येथे सत्यजीत बडे यांचा जन्म झाला. पुणे येथील गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्थेमधून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. यानुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेद्वारे त्यांची सन २००० मध्ये विकास शाखेत गटविकास अधिकारी/ उपमुख्य कार्यकारी अधिकारी या संवर्गात निवड झाली.

सत्यजित बडे यांनी सन २००२ ते २००७ या कालावधीत आंबेगाव आणि त्यानंतर सांगली जिल्ह्यातील वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून काम केले आहे. सन २०१३ ते २०१७  या कालावधीत ते पुणे जिल्हा परिषदेचे तर सन २०१७ ते २०१९ या कालावधीत सातारा जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सन २०१९ मध्ये त्यांची विकास शाखेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गात निवड झाली आणि या निवडीनंतर त्यांची वर्धा जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली. सन २०२२ पर्यंत त्यांनी वर्धा जिल्हा परिषदेत काम केले. सन २०२३ पासून ते रायगड जिल्हा परिषदेचे  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

दरम्यान, सत्यजित बडे यांनी गटविकास अधिकारी पदावर कार्यरत असताना विविध योजना यशस्वीरित्या राबविल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. सन २०१२ मध्ये  ग्रामविकास विभागांतर्गत देण्यात येणारा \'यशवंत गुणवंत अधिकारी\' हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळालेले  सर्वात कमी वयाचे ते पहिले अधिकारी आहेत‌‌. याशिवाय त्यांनी यशवंत पंचायतराज अभियानामध्ये उल्लेखनीय कामकाज केलेले आहे. शिवाय राज्य सरकारमार्फत गठीत करण्यात येणाऱ्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे. रायगड जिल्ह्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळताना ग्रामीण विकासाच्या दृष्टीने बडे यांचे कार्य उल्लेखनीय आहे.


वडिलांचा वारसा

सत्यजित बडे यांचे वडील कै.देवीदास बडे हे उपजिल्हाधिकारी होते. त्यांनी सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सन १९९९ मध्ये ते अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले होते.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx