अलिबाग : रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या टेम्पोवर कारवाई केली याचा राग धरून दोन आरोपींनी सहाय्यक फौजदाराला धक्काबुक्की केल्याची घटना रेवदंडा पोलीस ठाणे येथे घडली. याप्रकरणी दोन आरोपींविरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
९ मार्च रोजी मध्यरात्री रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील बोर्ली ते साळाव तपासणी नाकादरम्यान एक टेम्पो वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने उभा होता. सदर माहिती सहाय्यक फौजदार दिनेश पिंपळे यांना मिळताच घटनास्थळी जात त्यांनी टेम्पोमधील झीशान उलहक वसीम सातारकर आणि सर्वेश सुनील ठाकूर यांना समज दिली आणि दोघांना टेम्पो घेऊन पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले.
पोलीस ठाण्यात टेम्पो आणल्याच्या रागातून झीशान सातारकर व सर्वेश ठाकूर यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच सहाय्यक फौजदार पिंपळे यांच्याशी वाद घातला. तसेच त्यांना हाताबुक्क्याने मारहाण केली. या प्रकरणी दोघांविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx