Saturday, December 27, 2025
सार्वजनीक बांधकाम विभागाच्या सुस्त कारभारामुळे गेल‌ प्रकल्पाचे‌ काम रखडले
सार्वजनीक बांधकाम विभागाच्या सुस्त कारभारामुळे गेल‌ प्रकल्पाचे‌ काम रखडले ...

अलिबाग : राज्यात नवीन प्रकल्प आणण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशिल आहे. नव्या उद्याेगांना सर्व सुविधा सत्वर उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे धाेरण आहे. मात्र प्रत्यक्ष औद्योगिक जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यांतील उसर येथे हाेत असलेल्या भारत सरकारची अंगीकृत कंपनी असलेल्या गेल (इंडीया) कंपनीच्या माध्यमातून तब्बल ११ हजार २५६ काेटी रुपये गुतवणूक करुन उभारण्यात येत असलेल्या नविन पीडीएच-पीपी प्रकल्‍पाच्या उभारणीचे काम, गेल्या एक महीन्यांपासून सावर्जनीक बांधकाम विभागाच्या सुस्त कारभारामुळे पूर्णपणे ठप्प झाले आहे.  

३ नाेव्हेंबर २०२५ रोजी संध्‍याकाळी अचानकपणे अलिबाग-उसर रस्‍त्‍यावरील वढाव आणि वेलवली या दाेन गावाच्यामध्‍ये असलेला अलिबाग सार्वजनीक बांधकाम विभागाचा छोटा पुल कोसळला, आणि जाणारी-येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुलाला पर्यायी व्यवस्था सावर्जनीक बांधकाम विभागाने गेल्या महिनाभरापासून केलेली नाही. परिणामी गेल इंडियाच्या उसर येथील प्रकल्‍पासाठी येणारी परदेशी मशिनरी घेवून येणारी सर्व अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे ठप्‍प झालेली आहे. काेट्यावधी रुपये किमतीची मशिनरी घेवून येणारी ही अवजड वाहने तळाेजा, जेएनपीए, पनवेल, पेण येथे रस्त्याच्या बाजूला गेला महिनाभर उभी आहेत.

गेल कपंनीचे प्रशासन अधिकारी व संबंधित ठेकेदारांकडून अलिबाग येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या पुलाचे नविन बांधकाम लवकरात लवकर सुरु करण्‍याबाबत पाठपुरावा करण्‍यात येत आहे.  मात्र अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाने एक महिना झाला तरी अद्याप पर्यंत सया कोसळलेल्‍या पुलाच्या नविन बांधकामाची सुरवात देखील केलेली नाही.

गेल इंडीया कपंनीच्या नविन प्रकल्‍पाच्या उभारणीकरिता आवश्‍यक असणारी देश-विदेशातून आलेली उपकरणे घेऊन आलेली अवजड वाहने अलिबागच्या अलिकडे उपलब्‍ध असलेल्‍या रस्‍त्‍यावर किंवा मोकळ्या जागेत उभी करण्‍यात आलेली आहेत. यामुळे राष्‍ट्रीय दृष्‍ट्या अत्‍यंत महत्‍वाच्‍या अशा गेलच्‍या नविन पीडीएच-पीपी प्रकल्‍प उभारणीचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याची माहिती या निमीत्ताने प्राप्त झाली आहे. त्‍याचप्रमाणे ही  उपकरणे वाहतुक करणारी अवजड वाहने गेल कंपनीचे उसर येथिल नविन प्रकल्‍पापर्यंत पोहचू न शकल्‍यामुळे याचा परिणाम प्रकल्‍प उभारणीच्या कामावर व संबंधित ठेकदारांकडे कार्यरत बहुसंख्‍य स्‍थानिक व अन्‍य लोकांच्या रोजगारावर होण्‍याची माेठी शक्यता निर्माण झाली आहे.


अलिबाग-उसर रस्‍त्‍यावरील वढाव आणि वेलवली या दाेन गावाच्यामध्‍ये असलेला अलिबाग सार्वजनीक बांधकाम विभागाचा पूल नव्याने बांधण्याकरिता प्रस्ताव सावर्जनीक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्य शासनाकडे मंजूरी करिता पाठविला आहे. लवकरच मंजूरी हाेवून पूलाचे काम सुरु हाेणे अपेक्षीत आहे.

- संदेश शिर्के,

: मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx