अलिबाग : साळाव–तळेखार मार्गाच्या नूतनीकरणाचे काम रखडले असून, मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. मार्गावर ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना वाहन चालवताना तारेवरची करत करावी लागत आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि ठेकेदार यांच्या ढिसाळ कारभारामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, सोमवारी (दि.१८) भर पावसात नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे व उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसळ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी भर पावसात मुरुड तालुक्यातील साळाव येथे रास्ता रोको आंदोलन केले.
साळाव–तळेखार मार्गावर पडलेले खड्डे, मार्गावर असलेला चिखल, अपघात व प्रवाशांचे हाल यामुळे संतप्त नागरिकांचा आक्रोश आदोकानाच्या माध्यमातून स्पष्ट दिसून येत होता. पावसाची पर्वा न करता शेकडो नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी “ढिसाळ कारभार करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि कंत्राटदाराला नागरिक माफ करणार नाहीत; मागण्या मान्य न झाल्यास याहूनही भव्य आणि आक्रमक आंदोलन उभारले जाईल असा इशारा जिल्हाप्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे यांनी दिला.
आंदोलनादरम्यान नागरिकांचे निवेदन महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अधिकारी एम.के. सिंग यांना देण्यात आले. नागरिकांनी गणेशोत्सवाआधी सर्व खड्डे भरून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, डिसेंबर २०२५ पूर्वी संपूर्ण महामार्गाचे कॉंक्रिटकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी केली. यावर एम.के. सिंग यांनी २३ ऑगस्टपर्यंत मार्गावरील खड्डे बुजविण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले.
या आंदोलनात जिल्हापरिषदेच्या माजी सदस्य राजेश्री मिसाळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुरूड तालुकाप्रमुख नवशाद दळवी, युवासेना तालुकाप्रमुख किशोर काजारे, चणेरा विभाग प्रमुख मनोज तांडेल, चोरडे सरपंच तृप्ती घाग, साळाव सरपंच वैभव कांबळे, मिठेखार सरपंच अशोक वाघमारे, नंदकुमार मयेकर सहभागी झाले होते.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx