महाड : रायगड जिल्हयात राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. ठाकरे गटाच्या महाडमधील विधानसभेच्या उमेदवार स्नेहल जगताप आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत. यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे.
रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद सुरू आहे. त्यामुळे भरत गोगावले यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी ही खेळी खेळली असल्याची चर्चा सध्या रायगडच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मध्यंतरी स्नेहल जगताप यांचे भाजप प्रवेशासाठीदेखील प्रयत्न सुरू होते.
स्नेहल जगताप या काँग्रेसचे माजी दिवंगत आमदार माणिक जगताप यांच्या कन्या आहेत. महाड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. दोन वर्षांपूर्वी स्नेहल यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. 2024 मध्ये स्नेहल यांनी भरत गोगावले यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी स्नेहल जगताप यांना मदत केल्याचा आरोप भरत गोगावले यांनी केला होता.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx